Tuesday, January 14, 2014

आयुष्याचा अर्थ नवा - डॉ. विजय पांढरीपांडे

                 विविध नात्यागोत्यांचे पदर साध्या, सोप्या, प्रवाही भाषेत उलगडून दाखविण्याचे कसब डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कथातून प्रामुख्याने जाणवते.

                शहरी मध्यमवर्गीय माणसांच्या सुखदु:खांना हळुवार स्पर्श करणारे हे लेखन, शिकवणीचा किंवा उपदेशाचा कसलाही आव न आणतादेखील "आयुष्याचा नवा अर्थ" कुणालाही पटेल अशा सरळ भाषेत सहज सांगून जाते. सामाजिक, कौटुंबिक समस्यांची उकल करताना वाचता वाचता आपल्यालाही विचार करायला लावते. हा लेखक कथा ’लिहित’ नाही, तर तो वाचकांशी थेट संवाद साधतो.

                 शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रातील समर्थ अनुभवामुळे या लेखनाला एक वेगळे परिमाण लाभल्याचे प्रकर्षाने जाणवते.


वाचण्यासाठी : http://www.sahityasampada.com

Sunday, January 5, 2014

युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड

’युगद्रष्टा महाराजा’ सयाजीराव गायकवाड हे भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील द्रष्टा राजा. नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा दैवयोगाने बडोद्याचा राजा बनतो. स्वत: शिकतो आणि शिक्षणाने बडोदा राज्यात सर्वदृष्टीने परिवर्तन घडवितो. या लोकोत्तर राजाच्या चरित्रावर आधारलेली, अस्सल ऎतिहासिक दस्तऎवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने बाबा भांड यांनी लिहिलेली ही महाकादंबरी आहे. ब्रिटिशांनी भारतीय राजेशाहीला मांडलिकत्वाच्या जोखडात अडकवून ठेवले असताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी मात्र चातुर्याने क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांना आणि कर्त्या समाजसुधारकांना धैर्याने मदत केली, आर्थिक पाठबळ पुरविले: तसेच राजेशाहीचे लोकशाहीत रूपांतर करण्याचा धाडसी प्रयोग करून नवभारताच्या जडणघडणीचा पाया रचला. जनतेला मतदानाचा अधिकार, ग्रामपंचायतीची स्थापना, पंचायतींना प्रशासनाचे अधिकार देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण सक्तीचा प्राथमिक मोफत शिक्षणाचा कायदा, अस्पृश्यांसाठी खास शाळा, वाचनालयांची स्थापना, अस्पृश्यता, वेठबिगारी, बालविवाह प्रतिबंधक कायदे, विधवा पुनर्विवाह, ब्राम्हणेतरांसाठी वेदोक्त पाठशाळा हे कायदे करवून अंमलबजावणी केली. राज्यात समृध्दी आणण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, जमीन सुधारणा, आरोग्य सेवा, उद्योग-व्यवसायासाठी कौशल्य शिक्षण, कायद्याचे सामाजिकीकरण व पारदर्शी जनमाध्यमांचा प्रभावी वापर अशा अनेक मार्गांनी विधायक राजनीतीचा नमुनाआदर्श निमाण केला. नागरिकांमध्ये साहित्य व कलेची अभिरूची निर्माण करण्यासाठी आणि कलावंतांना राजाश्रय देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यशस्वी राज्यकर्ता, कुशल प्रशासक आणी द्रष्ट्या विचारवंतांची सर्व गुणवैशिष्ट्ये महाराजांकडे होतीच:परंतु अस्तित्वाची कोंडी करणाऱ्या घटना-प्रसंगावर मात करण्यासाठी लागणारी प्रबुद्धताही त्यांनी संपादित केली होती. त्यामुळे या कादंबरीची कथा जबाबदार लोकप्रतिनिधी, प्रशासक, नागरिक आणि उद्याच्या भारताचे भविष्य घडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेरणा देऊ शकेल.
प्रकाशक : साकेत प्रकाशन
ISBN : 978-81-7786-717-6
पृष्ठ संख्या : ५२८
किंमत : रु. ३००/- 

वाचण्यासाठी : http://www.sahityasampada.com