Monday, November 2, 2015

दशक्रिया - बाबा भांड

’दशक्रिया’ ही भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे. बुध्दी, चातुर्य व साहस पणाला लावून पोटाची खळगी भरू पाहणाऱ्या,  दारिद्रयाने ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते; आणि रोगट रुढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातिव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाच वेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अश्या अनेक वर्णांना व वर्गाना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती, आधुनिकीकरणाकडे पाठ फिरवणारे समूह, मानवी नात्यांचे पैशामुळे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली नगरी इत्यादी असंख्य गोष्टींना कवेत घेऊन सद्य:स्थितीचा क्लेशदायक दस्तऎवज बनते.



तटस्थ-वास्तवदर्शी शैलीमुळे, खोट्या काव्यात्मतेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यामुळे, सहज-ओघवत्या अचूक बोलभाषेमुळे अस्सल मराठी व मितव्ययी शब्दकळेमुळे, चित्रसदृश वर्णनांमुळे, आशयाशी अंगभूत झालेल्या चिंतनामुळे आणि जगण्यातून आलेल्या निश्चित वैचारिक भूमिकेमुळे बाबा भांड यांची ही कादंबरी आपल्या समकालीनांच्या साहित्यापेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. शिवाय कुमारापासून प्रौढांपर्यंतच्या सर्वच वाचकांना प्रभावित करण्याची अद्‍भुत क्षमता तिच्यात आलेली आहे. वास्तवाला हल्ली जी भयंकर अवकळा प्राप्त झाली आहे, ती लक्षात घेता, ’दशक्रिया’ ही कादंबरी हा एक मौलिक अपवादच म्हणावा लागेल. या अपवादाचे नाते साने गुरुजींच्या विशाल मानवी करुणेने निर्माण केलेल्या वाङ्‍मयीन प्रवाहाशी आहे.




-चंद्रकांत पाटील


वाचण्यासाठी : http://www.sahityasampada.com

Tuesday, January 14, 2014

आयुष्याचा अर्थ नवा - डॉ. विजय पांढरीपांडे

                 विविध नात्यागोत्यांचे पदर साध्या, सोप्या, प्रवाही भाषेत उलगडून दाखविण्याचे कसब डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कथातून प्रामुख्याने जाणवते.

                शहरी मध्यमवर्गीय माणसांच्या सुखदु:खांना हळुवार स्पर्श करणारे हे लेखन, शिकवणीचा किंवा उपदेशाचा कसलाही आव न आणतादेखील "आयुष्याचा नवा अर्थ" कुणालाही पटेल अशा सरळ भाषेत सहज सांगून जाते. सामाजिक, कौटुंबिक समस्यांची उकल करताना वाचता वाचता आपल्यालाही विचार करायला लावते. हा लेखक कथा ’लिहित’ नाही, तर तो वाचकांशी थेट संवाद साधतो.

                 शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रातील समर्थ अनुभवामुळे या लेखनाला एक वेगळे परिमाण लाभल्याचे प्रकर्षाने जाणवते.


वाचण्यासाठी : http://www.sahityasampada.com

Sunday, January 5, 2014

युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड

’युगद्रष्टा महाराजा’ सयाजीराव गायकवाड हे भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील द्रष्टा राजा. नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा दैवयोगाने बडोद्याचा राजा बनतो. स्वत: शिकतो आणि शिक्षणाने बडोदा राज्यात सर्वदृष्टीने परिवर्तन घडवितो. या लोकोत्तर राजाच्या चरित्रावर आधारलेली, अस्सल ऎतिहासिक दस्तऎवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने बाबा भांड यांनी लिहिलेली ही महाकादंबरी आहे. ब्रिटिशांनी भारतीय राजेशाहीला मांडलिकत्वाच्या जोखडात अडकवून ठेवले असताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी मात्र चातुर्याने क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांना आणि कर्त्या समाजसुधारकांना धैर्याने मदत केली, आर्थिक पाठबळ पुरविले: तसेच राजेशाहीचे लोकशाहीत रूपांतर करण्याचा धाडसी प्रयोग करून नवभारताच्या जडणघडणीचा पाया रचला. जनतेला मतदानाचा अधिकार, ग्रामपंचायतीची स्थापना, पंचायतींना प्रशासनाचे अधिकार देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण सक्तीचा प्राथमिक मोफत शिक्षणाचा कायदा, अस्पृश्यांसाठी खास शाळा, वाचनालयांची स्थापना, अस्पृश्यता, वेठबिगारी, बालविवाह प्रतिबंधक कायदे, विधवा पुनर्विवाह, ब्राम्हणेतरांसाठी वेदोक्त पाठशाळा हे कायदे करवून अंमलबजावणी केली. राज्यात समृध्दी आणण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, जमीन सुधारणा, आरोग्य सेवा, उद्योग-व्यवसायासाठी कौशल्य शिक्षण, कायद्याचे सामाजिकीकरण व पारदर्शी जनमाध्यमांचा प्रभावी वापर अशा अनेक मार्गांनी विधायक राजनीतीचा नमुनाआदर्श निमाण केला. नागरिकांमध्ये साहित्य व कलेची अभिरूची निर्माण करण्यासाठी आणि कलावंतांना राजाश्रय देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यशस्वी राज्यकर्ता, कुशल प्रशासक आणी द्रष्ट्या विचारवंतांची सर्व गुणवैशिष्ट्ये महाराजांकडे होतीच:परंतु अस्तित्वाची कोंडी करणाऱ्या घटना-प्रसंगावर मात करण्यासाठी लागणारी प्रबुद्धताही त्यांनी संपादित केली होती. त्यामुळे या कादंबरीची कथा जबाबदार लोकप्रतिनिधी, प्रशासक, नागरिक आणि उद्याच्या भारताचे भविष्य घडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेरणा देऊ शकेल.
प्रकाशक : साकेत प्रकाशन
ISBN : 978-81-7786-717-6
पृष्ठ संख्या : ५२८
किंमत : रु. ३००/- 

वाचण्यासाठी : http://www.sahityasampada.com

Friday, September 6, 2013

सप्रेम नमस्कार.


      
वाचनाचे महत्व आपण सर्वजण जाणूनच आहॊत. आपल्य़ाकडे उत्तमोत्तम साहित्यही उपलब्ध आहे. वाचनाची इच्छा असणारे वाचकही आहेत. जरी पुस्तक विकत घेऊन वाचणे परवडत नसले तरी वाचक वाचनालया मार्फत आपली पुस्तके वाचनाची आवड जोपासतात.
       
काही वेळा वेळेत वाचनालयात न जाता आल्यामुळे पुस्तके बदलली जात नाहीत. परदेशस्थ भारतीयांना वाचनाची आवड असेल तरी आपल्या भाषेतील पुस्तकांची उपलब्धता, त्यातही वाचनालयात असण्याची शक्यता कमीच. आपल्याकडे अजुन एक वर्ग आहे जो कि सतत संगणक व इंटरनेटच्या सानिध्यात असतो. १०-१२ तास संगणका समोर काम केल्यावर घरी येऊन पुस्तक हातात धरण्याची इच्छा न होणे स्वाभाविकच आहे. अशा व परदेशी वाचक वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन आम्ही एक अभिनव संधी उपलब्ध केली आहे. आतापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातुन पुस्तके विकण्यासाठी बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत. परंतु आम्ही त्या बरोबरच आपली पुस्तके रसिक वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत - साहित्यसंपदा.कॉम या ऑनलाईन वाचनालया मार्फत.
      
या ब्लॉग वर पुढल्या पोस्ट पासुन साहित्यसंपदा मध्ये असलेल्या पुस्तकांची थोडक्यात ओळख करुन देऊ.